मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत विटा तहसील कार्यालयाने ३ एप्रिल ते १० एप्रिल या काळात जातीचा दाखला कॅम्पचे आयोजन केले आहे, अशी माहिती तहसीलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. सध्या सर्वत्र राज्य सरकारच्या वतीने गतिमान शासन अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने आम्ही तहसील कार्यालयामार्फत जातीचा दाखला कॅम्प ३ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत खानापूर तालुक्यातील सर्व तलाठी सजाच्या ठिकाणी राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांना सहज आणि सुलभ पद्धतीने दाखले मिळण्यास मदत होईल. असे तहसीलदार टोम्पे म्हणाले.
कॅम्पचे आयोजन जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये नंदीवाले, मरीआई, गारुडी, मदारी, रामोशी, वडार, कुणबी इत्यादी समाज घटकांना प्राधान्याने जातीचे दाखले दिले जाणार आहेत. त्यांना जातीचे दाखले विविध शासकीय योजना, शैक्षणिक सुविधा तसेच नोकरी आणि इतर सरकारी लाभांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे या विशेष कॅम्पच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना त्वरित दाखले प्रदान करून त्यांचे शासकीय कामकाज सोपे करण्याचा उद्देश आहे.
तरी गावातील सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तलाठी कार्यालयात हजर राहावे. या मोहिमेंतर्गत दाखले काढून घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि गतिमान केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. तहसील कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम सुकर आणि प्रभावीरीत्या राबविणार आहोत, तरी सर्व लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही टोम्पे यांनी केले आहे.