विधानसभा निवडणुकीची मंगळवारी घोषणा झाली. २२ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष रणधुमाळीला प्रारंभ होत आहे. विधानसभा मतदारसंघांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण कोणाच्या विरोधात लढणार, मैदान कोण मारणार याची उत्सुकता मतदारांना लागलेली आहे. खानापूर आटपाडी येथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी विधानसभेला सरळ लढत निश्चित आहे. मात्र युती व आघाडीत इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे. तशी वाटचाल सुरू असल्याने लढत दुरंगी की तिरंगी याकडे लक्ष आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर होते. नंतर ते शिंदे गटात गेले. ज्याचा आमदार त्याला तो मतदार संघ यातून शिवसेनेच्या वाट्याला येणार असून आमदार बाबर यांचे सुपुत्र सुहास यांचे नाव निश्चित मानले जाते. मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्याने माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावाही केला. अपक्ष लढण्याचा त्यांचा निर्धार आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनीही लढण्याची तयारी काही महिन्यांपासून सुरू ठेवली आहे. लढण्यावर ते ठाम आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील, त्यांचे सुपुत्र ॲड. वैभव पाटील यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. महायुतीत सुरुवातीला बंडखोरीची शक्यता होती. नंतर पक्षांतर झाले. महाविकास आघाडीतही बंडखोरीची शक्यता आहे.
सुहास बाबर यांच्याविरोधात दोघांनी माघार घेऊन एकाचे नाव निश्चित करण्यावर एकमत झाले नाही. पक्षांतर सुरू झाले. कोणीही थांबायला तयार नाही. आमदार अनिल बाबर यांनी केलेली कामे, सुहास बाबर यांचा संपर्क व सहानुभूती ही जमेची बाजू आहे. तुलनेत विरोधकांत एकी व एकमतही नाही.