सध्या उन्हाळा सुरु झालेला आहे. सध्या अनेक भागात पाणी टंचाई देखील सुरु झालेली आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण देखील करावी लागत आहे. सांगली जिल्ह्यात गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तुलनेने जिल्ह्यात पाणीसाठा चांगला आहे. अद्याप अर्धा पाणीसाठा असून मात्र गेल्या महिन्याभरातील साठ्यात अकरा टक्क्यांची घसरण आहे; मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा २३ टक्के जादा साठा ही बाब दिलासा देणारी आहे. मात्र, तलाव, विहिरी आणि कूनलिकांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होऊ लागली असल्याने दुष्काळी तालुक्यात टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. यादरम्यान, तलावात पाणीसाठा वाढला होता. परंतु या भागात बागायती क्षेत्र वाढल्याने पिकांना पाणी देण्यासाठी उपसाही वाढला आहे. त्यामुळे पाणी पातळी घटली आहे.
दुष्काळी तालुक्यांना सिंचन योजनांचा दिलासा आहे. परंतु प्रकल्पातील पाणीसाठ्याची टक्केवारी ५१ टक्के असली तरी महिन्याला १० ते ११ टक्क्यांनी पाणीसाठा कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणीसाठा किमान एक महिना पुरेल अशी शक्यता आहे. सिंचन योजनाद्वारे तालुक्यातील सर्व तलाव पुन्हा भरून घ्यावेत, अशी मागणी आहे.
दुष्काळी भागात शेती, जनावरांसाठी व पिण्यासाठीच्या पाण्याची परिस्थिती बिकट होत आहे. अद्याप टँकरची मागणी मात्र झालेली नाही. जत पूर्वमध्ये टंचाईची स्थिती असून कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी या तालुक्यांना सिंचन योजनांचा दिलासा आहे; मात्र पाणी वाटपात काटेकोर नियोजनाची गरज आहे. हे नियोजन पोटकालवे, शाखा कालव्यांपर्यंत व्हायला हवे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता मार्चपासून जत पूर्व भागात टंचाईबाबत उपाययोजना कराव्या लागतील.
गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही यंदा टंचाई जाणवत आहे. मे-जूनपर्यंत जिल्ह्यातील १५७ गावांना पाण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. त्यासाठी १८७ टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. याबाबतचा संभाव्य टंचाई कृती आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.
