सध्या खून, मारामारी, चोरी, फसवणूक यामध्ये भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र सर्वानाच दिसत आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे भीतीचे वातावरण देखील निर्माण झालेले आहे. विटा येथे बसस्थानकात बसमध्ये जात असताना गर्दीचा फायदा घेत १ लाख २९ हजारांचे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरी झाल्याची फिर्याद जयश्री उदय जगताप (वय ४४, किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा, सध्या सैदापूर, ता.कऱ्हाड, जि. सातारा) यांनी विटा पोलिसांत दिली. गुरुवारी चोरीचा प्रकार दुपारी साडेबाराच्या सुमारास झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जगताप ही महिला कऱ्हाडला जाण्यासाठी विटा बसस्थानकात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आली होती.
त्या विटा-कऱ्हाड या बसमध्ये चढत असताना त्यांच्यासोबत असलेल्या पर्समधील लहान पर्समध्ये ठेवलेल्या ७५ हजार रुपयांच्या पंचवीस ग्रॅमच्या सोन्याच्या दोन बांगड्या, २७ हजारांच्या नऊ ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, २७ हजारांचे नऊ ग्रॅमचे तीन कानातील तीन सोन्याचे टॉप्स असे १ लाख २९ हजारांचे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरी झाली आहे.
दरम्यान, मंगल शिवाजी शिंदे (येवलेवाडी) यांचाही पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी झाल्याचा फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.