तळंदगे गावच्या सरपंच संदीप पोळ यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल….

सध्याच्या काळात अनेक गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झाल्याचे चित्र आपणाला पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना देखील निर्माण झालेली आहे. हातकणंगले तालुक्यात असा एक प्रकार उघडकीस आलेला आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातील तळंदगे गावचे सरपंच संदीप पोळ यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे.

मांडव घालण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत सरपंच संदीप पोळ हे किरकोळ जखमी झाले असुन गावातील एका तरुणांने जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा आरोप पोळ यांनी केला असुन सागर मेटकर या तरुणाविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालु होते.

मात्र तळंदगे गावच्या नागरिकांनीही हुपरी पोलिसांना तळंगेच्या सरपंच विरोधात तक्रार दिली आहे. तळंदगे गाव आता नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वीही सरपंच संदीप पोळ यांच्या विरोधात मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद यांच्याकडे तक्रार दाखल आहे. त्याची सुनावणी सुरु असुन आता गणेश जयंतीच्या निमित्ताने उभा केलेल्या मंडपाने हा नवीन वाद झाला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पोळ यांनी मुख्य रस्त्याच्या मध्ये येणारे मंडप जरा बाजुला करा असे सांगत असताना सागर मेटकर आणि काही तरुणांनी सरपंच पोळ यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.

याचे तीव्र पडसाद उमटले असुन माझा संतोष देशमुख झाला असता अशी भीती सरपंच पोळ यांनी व्यक्त केली. संबंधितांवर ऍट्रॉसिटी, शासकीय कामात अडथळा आणणे, असे गुन्हे नोंद करा, अशी तक्रार सरपंच पोळ यांनी हुपरी पोलिसांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात सरपंचांवरील वाढते हल्ले चिंताजनक बनले आहेत.