सांगोल्यात शेततळ्यात पडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

सांगोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चक्क तीन वर्षाच्या बालकाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला आहे. तीन वर्षीय मुलाचा शेत तळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास चोपडी (ता. सांगोला) येथे घडली आहे. प्रियांश अजित भोसले ( वय ३, रा. चोपडी) असे मृत बालकाचे नाव आहे. अजित भोसले यांचे चोपडी येथे कापड दुकान आहे. ते कापड दुकानात गेले होते तर घरी इतर कुटुंबीय होते. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास प्रियांश हा घरी खेळत होता परंतु तो दिसून आला नाही म्हणून भोसले कुटुंबातील सर्वजण प्रीयांश याचा शोध घेत होते.

परंतु तो मिळून येत नव्हता. प्रियांशचा शोध लागत नसल्याने सर्वजण काळजीत होते. भोसले कुटुंबीयांनी प्रियांश याचा आजूबाजूला शोध घेऊन चौकशी केली. तसेच प्रियांश हरविल्याबद्दल सर्वांना सांगितले पण तो मिळून आला नाही. दरम्यान सायंकाळी शेत तळ्याजवळ शोध घेताना त्यांना प्रियांश शेततळ्यात पडला असल्याचे निदर्शनास आले.

त्याला पाण्यात उतरून काढल्यानंतर लगेच सांगोला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मृत पावल्याचे सांगितले. प्रियांश याचा आकस्मित पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगोला पोलिसांत खबर दिली.