सध्याच्या काळात फसवणुकीच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसतच आहे. या फसवणुकीला अनेकजण बळी पडतानाचे आपण पाहतच आहोत. अनेक कंपन्यांकडून सर्वसामान्य जनतेची फसवणूक होऊ लागलेली आहे. असाच एक फसवणुकीचा प्रकार आटपाडीत उघडकीस आलेला आहे. आटपाडी येथील सर्वसामान्य महिलांना विश्वासात घेऊन स्थापन केलेल्या बचत गटाच्या नावावर काढलेल्या कर्जाची आणि बचत गटाची शिल्लक रक्कम घेऊन महिला पसार झाली आहे. कर्ज घेतलेल्या खासगी फायनान्स कंपन्यांनी गटांतील महिलांकडे वसुलीसाठी तगादा लावला.त्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
त्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. लता सागर, लता कुंभार, स्वाती सरतापे, उषा चंदनशिवे, वंदना भिसे, ऐश्वर्या पवार, कविता खरात, लक्ष्मी खरात आणि नकुसा खरात या फसवणूक झालेल्या महिला उपोषणात सहभागी झाल्या आहेत. मुलाणकी येथील सलमा कामरुद्दी मुलाणी आणि कामरुद्दीन आलम मुलाणी (रा. मुलाणकी) महिलांच्या संपर्कात आले. त्यांनी विविध राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफक दरात बचत गटाला मिळवून देण्याचा शब्द देऊन बचत गटांची स्थापना करून घेतली. गटातील महिलांनी सर्व कर्जासाठी लागणारी कागदपत्रे दिली.
बचत गटाच्या नावावर कर्ज घेतले. त्यातील थोडी कर्जाची रक्कम गटातील महिलांना दिली. प्रत्यक्षात मुलाणी दांपत्याने बचत गटांच्या नावावर ज्यादा पैसे घेतले होते. बचत गटांचे शिल्लक आणि खासगी फायनान्स कंपन्यांकडून गटातील महिलांच्या नावावर घेतलेले पैसे घेऊन ते पसार झाले. खासगी फायनान्स कंपनीने गटातील महिलांकडे वसुलीचा तगादा लावल्यावर फसवणुकीचा हा प्रकार उजेडात आला. तसेच इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील एजंटांनीही गटातील महिलांची फसवणूक केली आहे. त्याची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याने फसवणूक झालेल्या महिलांनी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
बँकेने बचत गटांतील महिलांच्या बँकेतील खात्यावर पैसे जमा केले आहेत. सदर महिलांनी कर्जाची रक्कम स्वतः विड्रॉल पावत्यांवरती सही करून काढल्या आहेत. त्यानंतर या महिलांनी स्वत:हून दुसऱ्या महिलेला पैसे दिलेत. बचत गटांतील महिलांच्या बनावट सह्या काढून पैसे काढलेले नाहीत.