आटपाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव विजय हजारे यांच्या घरात चोरी

आटपाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव विजय हजारे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी दोन तोळ्यांचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवारी किंवा शुक्रवारी रात्री घडली. वैभव हजारे हे पंचायत समितीजवळ एका हॉटेलच्या पाठीमागे राहतात. दोन दिवसांची रजा घेऊन ते पत्नी माधुरी यांच्यासमवेत गुरुवारी मूळ गावी केडगावला गेले होते. शनिवारी घरमालक जरे यांचा फोन आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. चोरट्याने हजारे यांच्या घराचा कुलूप-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेल्या ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे असा १.५ लाखांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास करून पोबारा केला. हजारे यांची पत्नी माधुरी केडगाव येथे असून, त्यांचा संपर्क न झाल्याने आणखी काही दागिने लंपास झालेत की नाहीत ते समजू शकले नाही. याबाबत वैभव हजारे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, शहरातील सचिन पंडित तवटे यांच्या घरीसुध्दा चोरी झाली.