सुहास बाबर आणि रोहित पाटील यांनी गिरविला आबा-भाऊंच्या मैत्रीचा किस्सा! नवीन आमदारांचा मैत्रीचा धागा होणार मजबूत…

माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील, अनिल बाबर यांची मैत्री अख्ख्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे.१९९० च्या दशकापासून ते आजअखेर तासगावचे आमदार आर. आर. पाटील व खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर विधानसभेत आहेत. पैकी आर. आर. आबा अखंड आमदार होते. मात्र अनिल बाबर यांना दोनवेळा अपयश आले. दोघांचे पक्ष विभिन्न, मात्र मैत्रीची वीण अगदी घट्ट, अशी आजपर्यंत स्थिती होती.

आबांच्या मंत्रिपदासाठी अनिल बाबर यांचा आग्रह सर्व महाराष्ट्राने पाहिला. अगदी भावाप्रमाणे दोघांनी एकमेकांना सांभाळून घेत मतदार संघातल्या कामावर जोर दिला होता. आर. आर. पाटील राष्ट्रवादीतून मंत्री झाले. अनिल बाबर यांचा पक्ष वेगळा, मात्र तरीही त्यांच्या कोणत्याही कामाला पाटील यांनी अडसर येऊ दिला नाही. मतदारसंघ बदलला. विसापूर मंडलमधील २१ गावे खानापूर- आटपाडी मतदारसंघाला जोडली गेली. आबांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते व मतदार त्यामुळे तासगावपासून दूर गेले. मात्र ही पोकळी अनिल बाबर यांनी कार्यकर्त्यांना कधी जाणून दिली नाही.

पक्ष कोणताही असो, निवडणुकीला अनिल बाबर यांना सातत्याने आबा गटाने मदत केली. विरोधी पक्षात असूनदेखील सर्व कार्यकर्त्यांना मदतीसाठी ‘मेसेज’ असायचा. त्यामुळे या दोघांची मैत्री किती अतूट होती, हे सर्व मतदार संघाने पाहिले. या निवडणुकीत रोहित पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून, तर सुहास बाबर हे शिवसेनेकडून निवडणुकीत उभे होते. दोघांचे पक्ष वेगळे होते. तुतारी चिन्ह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर धनुष्यबाण हे शिंदे शिवसेनेला असल्यामुळे विसापूर मतदारसंघातल्या मतदारांना विशेषतः आबा गटाने तुतारीला मदत करावी, अशी अपेक्षा होती.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रचार सभा झाली. पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी तुतारीचे काम करावे, अशी थेट अपेक्षा व्यक्त केली होती. काम न केल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. आबा गटाने सुहास बाबर यांच्यामागे ताकद उभी केली. आबांचा संपूर्ण गटाशिवाय माजी खासदार संजय पाटील यांच्या एका गटाने बाबर यांना मतदान केले. बाबर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. विसापूरसह २१ गावांनी सुहास बाबर यांना चांगलीच मदत केली. आबा आणि अनिल बाबर यांच्या मैत्रीचा किस्सा सुहास बाबर आणि रोहित पाटील यांनी गिरविला. गट वेगळा, पक्ष ही वेगळा, मात्र कसलाही मनात किंतू न आणता कार्यकर्ते सुहास बाबर यांच्या पाठीमागे ठामपणे राहिले. यामुळे या दोघांतील मैत्री आणखी घट्ट झाली.