खानापूर तालुका अमली पदार्थमुक्त करणार ;आमदार सुहास बाबर

विट्यातील ड्रग्ज कारखाना आणि गांजा प्रकरणावर आमदार सुहास बाबर बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यात वैभव पाटील यांनी, जिल्हा नियोजन समितीमध्ये गांजा आणि ड्रग्जचे विषय काढून आमदारांनी फक्त देखावा केला, असा आरोप केला होता.आमदार बाबर म्हणाले, विटा ड्रग्ज कारखाना प्रकरणात ज्या संशयिताला अटक केली आहे.

गेल्या 10-12 वर्षात त्याचे बस्तान बसण्यासाठी कुणी मदत केली, डी फायनान्स नावाची कंपनी तो काढतो, इतके पैसे त्याच्याकडे कसे आले? कोणाबरोबर तो असतो, या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे. शहर आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. मात्र प्रशासनाच्या माध्यमातून आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. सावकारी प्रकरणातील कार्यकर्त्यांना कोणाचे पाठबळ आहे? असा सवाल त्यांनी केला.

आ. बाबर म्हणाले, शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा अमली पदार्थमुक्त शहर असेल, या विषयावर आपण प्रशासनाशी बोललेलो आहे. कोणत्याही परिस्थितीत खानापूर तालुका अमली पदार्थमुक्त झाला पाहिजे, हा आपला आग्रह आहे. मात्र शहर अमली पदार्थमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे.