आटपाडी तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी शिक्षण विभाग व तहसीलदारां मार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार आज बुधवारी ५ मार्च रोजी सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत आटपाडी तहसील कार्यालय, दिघंची ग्रामपंचायत कार्यालय, करगणी ग्रामपंचायत कार्यालय, खरसुंडी ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुक्यातील या चार जिल्हा परिषद गटांमध्ये दाखले काढून दिले जाणार आहेत. या विशेष मोहिमेसाठी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांचे दाखले वेळेत मिळावेत यासाठी योग्य नियोजन करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
आटपाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ कोळपे यांनी १ ते १२ पर्यंत सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांचे डोमिसाईल, जातिचे दाखले, उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले आणि अन्य दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करुन या मोहिमेचा लाभ घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जात, रहिवासी, डोमिसाईल आणि उत्पन्न दाखले विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचे आदेश आटपाडी तहसीलदार सागर ढवळे यांनी दिले आहेत. यानुसार तहसील कार्यालयामार्फत विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.