2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की काय ठरलं होतं? अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला होता का? याचं गूढ अजूनही कायम आहे. कारण ठाकरे गटाच्या मते अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. तर, भाजपच्या म्हणण्यानुसार असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता. त्यामुळे नेमकं काय ठरलं होतं? याचं रहस्य कायम आहे. आता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रकाश टाकला आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मागितलं होतं. पण अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
उलट मीच त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘द जयपूर डायलॉग्स’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत 2019चा घटनाक्रमच सांगितला. नेमकं काय घडलं होतं? याची सविस्तर माहिती दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी आम्ही युतीसाठी बसलो होतो. आमची युती फायनल झाली होती. पण एका रात्री उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं, “देवेंद्रजी, आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद पाहिजे. मी तुमच्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट टाकली आहे. आता अंतिम निर्णय आज करू. आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवंय.
रात्री 1 वाजता उद्धव ठाकरे मला बोलले.” मी म्हटलं, मी याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही. माझा पक्ष संसदीय बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेतो. आमचे अध्यक्ष अमित शाह आहेत. मी अमित शाह यांच्याशी बोलतो. त्यानंतर मी अमित शाह यांना रात्री 1 वाजता फोन केला. ते जागे होते. मी त्यांना म्हटलं आपलं सीट शेअरिंग फायनल झालं आहे. पण उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवं. अमित शाह म्हणाले, ते मंजूर नाही. तुम्ही त्यांना सांगा आम्हाला मंजूर नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.