सांगोला येथे माघ वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना संत सेवा मंडळाच्या वतीने जेवणाची सोय

मिरज-पंढरपूर रोडलगत सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर तिप्पेहळ्ळी येथे गेल्या २५ वर्षांपासून संत सेवा मंडळ तिप्पेहळ्ळी माघ वारीला पंढरपूरला येणाऱ्या संत आणि वारकऱ्यांची सेवा केली जात आहे. ह.भ.प. संत तुकाराम नरळे महाराज (म्हातारबाबा) यांच्या प्रेरणेने २५ वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना झाली. अंदाजे शंभर वर्षांपूर्वी नरके महाराज कायलीमध्ये खीर करून दिंडीसाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून देत असत. त्यांच्याच प्रेरणेतून संत सेवा मंडळाने त्याच ठिकाणी माघ वारीसाठी अखंड हरिभक्त सप्ताह सेवेची सुरुवात केली आहे.

या सप्ताहात पंढरपूरला पायी चालत येणाऱ्या गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, सांगली, कोल्हापूर येथून येणाऱ्या अंदाजे पाचशे ते सातशे भाविक दररोज भेट देतात. दोन एकर जागेत प्रशस्त मंडप उभारून दररोज रोज तीन हजार ते चार हजार लोकांचे जेवण, चहा-नाष्टा अंघोळीचे गरम पाणी, राहण्याची सोय याठिकाणी विनामूल्य केली जाते. दररोज येथे आनंदाने लोकांची ये-जा असूनही कोणत्याही प्रकारची चोरी येथे होत नाही. एखादी वस्तू कोणाला सापडल्यास भाविक ती वस्तू या मंडळाकडे जमा करतात. या संत सेवा मंडळातील सदस्य व त्यांची कुटुंबे प्रसाद बनविण्यापासून सर्व कामे मनोभावे करतात.

या मंडळातील २० ते २५ सदस्य आर्मी, पोलिस व इतर शासकीय सेवेत आहेत. ते सात दिवस सुट्टी घेऊन सहकुटुंब येथे सेवेसाठी हजर असतात. पहिल्या दिवशी प्रसादाची सुरुवात ही संत सेवा मंडळाच्या वर्गणीतून होते. भाविक तांदूळ, गहू, गूळ, डाळ, भाजीपाला, पैसे वगैरे स्वरुपात मदत देतात.