विट्यात गांजा विकणाऱ्या दोन महिलांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

साळशिंगे (ता. खानापूर) आणि मायणी (ता. खटाव, जि. सातारा) येथे गांजा विकणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हुसेनबी गुलाब शेख (रा. साळशिंगे) आणि शोभा बाळकृष्ण चिवटे (रा. मायणी) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार उत्तम माळी यांनी फिर्याद दिली. विट्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास सक्त गस्तीच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी गस्त सुरू असताना हवालदार संभाजी सोनवणे यांना माहिती मिळाली की, साळशिंगे येथे वनवासवाडी रस्त्यालगत एका घराजवळ एक महिला गांजा विकत आहे.

त्यांनी पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांना ही माहिती दिली. ते पोलिस पथकासोबत साळशिंगे येथे गेले असता, हुसेनबी शेख ही घराबाहेर गांजाची विक्री करताना सापडली. तिला ताब्यात घेतले तिच्याकडील पिशवीत ६२५ ग्रॅम गांजा सापडला. हुसेनबी शेख हिला गांजा कोठून आणला, अशी विचारणा केली असता, तिने तो गांजा मायणी येथील शोभा चिवटे हिच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिस पथकाने मायणी येथे जाऊन संशयित शोभा चिवटे हिच्या घराची झडती घेतली. असता, तिथे १२ किलो ८५६ ग्रॅम गांजा सापडला. त्यामुळे या दोन्ही संशयित महिलांना अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पुढील तपास करीत आहेत.