सांगोल्यात शॉर्टसर्किटमुळे डाळिंबाची बाग जळून खाक…..

डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन व डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन वाकीघेरडी (ता. सांगोला) येथील सुरेश झिंजुरटे या शेतकऱ्याची डाळिंब बाग जळून खाक झाली आहे.

सांगोला तालुक्यातील वाकी घेरडीसह परिसरातील महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तार खूप जीर्ण झाल्या असून, त्या केव्हाही तुटतात. तारांचे घर्षण होऊन आगीच्या घटना घडल्याने शेतातील पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे अनेक वेळा आर्थिक नुकसान झाले आहे.

तसेच विद्युतपुरवठा खंडित झाल्याने विद्युत प्रवाह पुन्हा सुरू करण्यासाठी एक दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन व डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन वाकी (घेरडी, ता. सांगोला) येथील सुरेश झिंजुरटे या शेतकऱ्याची डाळिंब बाग जळून खाक झाल्याची घटना घडली.

या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. डाळिंब बाग जोपासण्यासाठी झिंजुरटे कुटुंबीयांनी खूप मेहनत घेतली होती.