शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य शासनाच्या मंजुरीनंतर कामाला गती

वर्धा ते पत्रादेवी हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार आहे. याच्या भूसंपादनास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर सांगली जिल्ह्यात यााठी चिन्हांकनाच्या (मार्किंग) कामास सुरुवात झाली आहे.कर्नाळ, पद्माळे, बुधगाव, कवलापूर येथे चिन्हांकन करण्यात आले. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे.

वर्धा ते पत्रादेवी हा शक्तिपीठ द्रुतगती मार्ग नागपूर आणि गोव्याला जोडणार आहे. हा एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेतील तीन शक्तिपीठांना जोडला जाणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील संपर्क सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ किंवा नागपूर-गोवा द्रुतगती मार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

सहापदरी एक्स्प्रेस वेमुळे प्रवासाचा वेळ २१ तासांवरून ८ तासांवर येईल. शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटरचा महामार्ग असेल. सुरुवातीला तो ७६० किलोमीटरचा होता. त्यात वाढ झाली आहे.

सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील बाणुरगडमध्ये महामार्गाचा प्रवेश होईल. तिथून कवठेमहांकाळ तालुक्यात तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकीतून मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी अशा गावांमधून तो जाणार असल्याने या ठिकाणी मार्किंग केले जात आहे.