आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. पण त्याआधी काही ठिकाणी नेते, माजी आमदार किंवा कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ दिसत आहे. सध्या कोकणात महायुतीत अशी रस्सी खेच पाहायला मिळत असून येथे ठाकरे गटाचे अनेक नेते पक्षाला राम राम ठोकून दुसर्या पक्षात प्रवेश करत आहेत. यामुळे ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असून असे धक्के आता शरद पवार गटालाही बसण्यास सुरूवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची साथ सोडली आहे.
विराज नाईक यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. विराज नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे सुपुत्र आहेत. तर त्यांच्या राजीनामा हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना धक्का मानला जात आहे. विराज नाईक हे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.दोन दिवसांपूर्वीच विराज नाईक यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एसटी प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले होते.
पण आता अचानक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क काढले जात आहेत. तर मुलाने अशा पद्धतीने तडकाफडकी राजीनामा दिल्याने माजी आमदार मानसिंगराव नाईक हे देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाला अनेक पदाधिकारी राम राम ठोकत असून भाजपसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष यांने आपला पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.