इस्लामपुरात कोणत्या पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात इतिहासात पहिल्यांदाच सर्व पारंपारिक विरोधक एकत्र आल्याने निशिकांत पाटील यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. प्रारंभी जयंत पाटलांना सहजसोपी वाटणारी निवडणूक आता काटे की टक्कर वर जाऊन पोहचली आहे.

गेल्या 35 वर्षांच्या आपल्या विकासकामांवर व जनसंपर्कावर आपण सहज निवडून येऊ असा विश्वास जयंत पाटील यांना आहे, तर विकासकामांतील उणिवा व जयंत पाटील यांच्या मालकीच्या कारखान्याकडून ऊस उत्पादकांची पिळवणूक या मुद्द्यावर मतदार आपल्याला निवडून देतील असा दावा निशिकांत पाटलांचा आहे.इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील सलग सात निवडणूका सहज जिंकले आहेत. आजपर्यंत त्यांना कोणत्याही निवडणूकीत फारसे कष्ट करावे लागले नव्हते. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे.