आटपाडी येथील शासकीय विश्रामगृहावर माणगंगा साखर कारखान्याचे सभासद, कर्मचारी आणि शेतकर्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी यू. टी. जाधव, महादेव पाटील, विनायक पाटील, विष्णू अर्जुन, हरिदास गायकवाड, अशोक माळी, मच्छिन्द्र माळी, राहुल सपाटे, चंद्रकांत काळे आदी उपस्थित होते. माणगंगा साखर कारखान्याच्या सभासदांचे मत असल्यास मी नेतृत्व करेन. माणगंगा कारखाना सभासदांचा राहावा, यासाठी प्रयत्न करेन. तो लिलावात विकू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. ते म्हणाले, शेतकर्यांनी कारखान्याला दिलेली जमीन आणि कारखाना विकायचा नाही. माणगंगा सभासदांची मालकी आहे.
या मालमत्तेला तिलांजली देऊन होणारा मनमानी कारभार आम्ही होऊ देणार नाही. सभासदांना न्याय देण्यासाठी मी जिवाचे रान करेन. स्थानिक आमदारांनी कारखान्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तानाजी लवटे, कामगार, वाहनचालक, शिक्षक व सभासदांनी मनोगत व्यक्त करताना आम्ही कसे अडचणीत आलो, याची कहाणीच कथन केली. यावेळी माणगंगा बचाव समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी तानाजी लवटे यांची निवड करण्यात आली. सर्वानुमते अन्य सदस्य निवडून समितीच्या माध्यमातून माणगंगा बचाव मोहीम तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.