अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी चोरीच्या प्रकारात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. दिवसाढवळ्या चोरी होऊ लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. इचलकरंजी शहरात देखील चोरीच्या घटनात वाढ होऊ लागली आहे. शहरात मुख्य मार्गावरील एक हॉटेल व जैन मंदिरात सोमवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. दोन्ही ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात चांदीची भांडी, पूजेचे साहित्य तसेच रोख रक्कम असा एकूण अंदाजे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
याप्रकरणी गावभाग व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रिंगरोड वरील सीईटीपी ते पाटील मळा मार्गावर असलेल्या सुमतीनाथ जैन मंदिरातील चोरट्यांनी चांदीची भांडी तसेच दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली. झोपलेल्या वॉचमनच्या खोलीला चोरट्यांनी बाहेरून कडी लावून ही चोरी केली. दानपेटीतील रोख २० हजार रूपये, जुन्या चांदीच्या सहा वाट्या, पूजा साहित्यातील केशर, चंदन असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद गावभाग ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पूजेसाठी उठल्यानंतर वॉचमन अक्षय हत्तेकर याला दरवाजाला बाहेरून कडी असल्याचे लक्षात आले. याबाबतची माहिती त्याने मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पुजारी नरपतलाल मूलचंद सोलंकी यांना दिली. त्यानंतर सोळंकी हे मंदिरात आल्यानंतर वॉचमनच्या रूमची कडी काढली त्यानंतर दोघांनी मिळून मंदिराची पाहणी केली. तेव्हा मंदिराच्या पाठीमागील बाजूला असणाऱ्या तळ मजल्यावरील शटरचे लॉक तुटलेले दिसले.
तसेच मंदिरातील आतील दरवाजाचेही कुलूप उचकटून तुटल्याचे दिसून आले.
यावेळी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले. तसेच स्टोअर रूममधील दोन तिजोऱ्याची तोडफोड करून त्यातील ६०० ग्रॅम वजनाच्या ६ चांदीच्या वाट्या यासह चंदन, केशर असे पूजेचे साहित्य चोरीला गेले.
गावभाग पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी मंदिरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. यामध्ये दोन चोरटे चोरी करत असल्याचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून मंदिरातील मूर्ती देखील चोरण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी नरपतलाल सोलंकी यांनी गावभाग पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पंचगंगा साखर कारखान्यानजीक असलेल्या स्वागत कमानीजवळील हॉटेल संदेशमध्ये चोरी झाली. सोमवारी मध्यरात्री दीड ते साडेचार या कालावधीत ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश करत ड्रॉवरमधील ४९ हजार ४०० रुपये रोख रक्कम लंपास केली. याबाबत हॉटेल मालक राहुल आवळे यांनी शिवाजीनगर पोलीसात फिर्याद दिली आहे.हॉटेलमधील या चोरीची घटना देखील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
यामध्ये तीन चोरटे दिसून येत आहेत. चोरट्यांनी हॉटेलचा दरवाजाचे कुलूप न तोडता खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश केला. यावेळी एका चोरट्याने रस्त्यावर पहारा दिला. दुसऱ्याने खिडकीतून अलगद आत जात रोख पैसे चोरले व अन्य एकाने त्याला आधार दिला. संशयित चोरटे हॉटेलच्या पाठीमागूनच प्रवेश करून तिथूनच पसार झाले. घटनास्थळी पोलिसांना हॉटेलच्या पाठीमागे चिल्लर पैशाचा डबा मिळून आला आहे. चोरट्यांनी जाताना नोटा घेवून चिल्लर तिथेच टाकून पलायन केले. दरम्यान, हॉटेलच्या वरच्या मजल्यावरच राहणाऱ्या कामगारांना याची कोणतीच कुणकुण लागली नाही.