सध्या प्रत्येक भागात काही ना काही गुन्हेगारी घडतच राहते. किरकोळ भांडणे देखील रॊद्र रूप धारण करतात. मग यामध्ये खूप मोठी किंमत सहन करावी लागते. ‘बदनामी का करतोस,’ या कारणावरून गलाई व्यावसायिकास दोघांना मारहाण करून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सात जणांविरोधात विटा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. अविनाश जाधव (शेळकबाव, ता.कडेगाव), तुषार धनाजी मदने (हिंगणगादे, ता. खानापूर), आतिष बोडरे (गार्डी, ता. खानापूर ) व चार अनोळखी या सातजणांवर गुन्हा नोंद झाला.
संदीप तुकाराम साळुंखे (वय ३४, मूळ हिंगणगादे, ता. खानापूर; सध्या होलीचकला मेन बझार फत्तेपुरा, जि. दाहोद, गुजरात) या गलाई व्यावसायिकाने विटा पोलिसांत फिर्याद दिली. ही घटना रविवारी (ता. ९) सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, साळुंखे यांनी वरील मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सुटून विटा पोलिस ठाणे गाठले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप साळुंखे यांचे हिंगणगादे येथील राहत्या घराजवळून अविनाश जाधव यांच्या सांगण्यावरून तुषार मदने, आतिष बोडरे व चार अनोळखींनी साळुंखे यांच्या दुचाकीवरून शेळकबाव येथे नेले. तेथे अविनाश जाधव याने, ‘तू माझी बदनामी का करतोस? मी कोण आहे तुला माहीत नाही,’ असे म्हणून स्टीलच्या पाईपने साळुंखे यांच्या पाठीवर, दोन्ही हातावर, पायावर मारून जखमी केले व दोन अनोळखींनी कमरेच्या पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तुषार मदने, आतिष बोडरे व त्यांच्यासोबतच्या दोघा अनोळखींनीही साळुंखे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. तेथून साळुंखे यांना चाकचाकी वाहनात जबरदस्तीने घालून कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव ते हातकणंगले रस्त्याकडेला असलेल्या झाडीत नेऊन तेथे दमदाटी केली. ‘तू माझ्या नावाची बदनामी केली आहे, तर आता बदनामी मिटविण्यासाठी पाच लाख रुपये दे,’ अशी धमकी दिली. तेथे विजय नामदेव खवळे यादेखील स्टीलच्या पाईपने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. बदनामी मिटविण्यासाठी उद्या पैसे देण्याच्या मुदतीवर साळुंखे व त्यांचा मित्र विजय खवळे यांना इस्लामपूर येथे राहुल मोहिते व रमेश मदने यांच्या ताब्यात दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.