आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडीतील डाळिंब उत्पादक शेतकरी सचिन दगडू लेंगरे यांच्या बँक खात्यातून दि. 13 रोजी रात्री 1.42 मिनिटांनी 1 लाख रुपये गायब झाले आहेत. या फसवणुकीबाबत त्या शेतकर्याने सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार दिली आहे.याबाबत लेंगरे यांनी दिलेली माहिती अशी की, दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला त्यांनी शेतातील डाळिंबे व्यापार्याला विक्री केली होती. त्या डाळिंबांचे त्यांना दोन लाख 12 हजार रुपये आले होते. त्या एकूण 2 लाख 12 हजार रुपये रकमेपैकी त्यांच्या खात्यातून दि. 13 रोजी रात्री 1.42 वाजता अचानक 1 लाख रुपये कमी झाले.
सदर बाब त्यांच्या दि. 14 रोजी सकाळी लक्षात आली. याबाबत त्यांनी तातडीने बँक ऑफ इंडिया शाखेशी संपर्क साधला असता सायबर क्राईमला तुमची तक्रार करा, असा सल्ला देऊन बँकेने हात वर केले आहेत. शेतकर्याने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली आहे. पुढील कारवाईसाठी आटपाडी पोलिस ठाण्यात संपर्क करा, असा मेसेज त्यांना मोबाईलवर आला आहे.
तालुक्यात बँक खातेदाराच्या खात्यातून पैसे आपोआप ट्रान्स्फर होऊन फसवणूक होण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. याबाबत संबंधित बँका मात्र कसल्याही प्रकारची जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. ज्या विश्वासाने बँकेत रक्कम खात्यावर ठेवली जाते, त्या पटीत सुरक्षा मिळत नसल्याने अनेक बँकांच्या ग्राहकांतून बँकेच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर डाळिंब उत्पादक शेतकरी सचिन लेंगरे यांनी आटपाडी येथील कायदेतज्ज्ञ धनंजय पाटील यांना घेऊन बँक शाखाधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी बँक शाखाधिकारी यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला व फसवणूक झालेल्या रकमेचा परतावा मिळावा म्हणून बँकेकडून विम्याची तरतूद आहे असे सांगण्यात आले आहे.