हातकणंगले तालुक्यातील शेतकर्‍यांना जमीन मोजणीच्या नोटिसा, शेतकर्‍यांमध्ये पसरली तीव्र नाराजी

सध्या राष्ट्रीय महामार्गाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही भागात या महामार्गाविषयी नाराजी तर काही भागात याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चोकाक ते उदगाव-अंकली दरम्यानच्या दहा गावांतून जाणार आहे. यासाठी भारत सरकारने 25 जानेवारी रोजी राजपत्र प्रसिद्ध केले असून हरकती दाखल करण्यासाठी शेतकर्‍यांना 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, हरकती देण्यापूर्वीच हातकणंगले तालुक्यातील चोकाक आणि माणगाववाडीच्या शेतकर्‍यांना जमीन मोजणीच्या नोेटिसा काढण्यात आल्या आहेत. 17 फेब्रुवारीला मोजणी होणार असल्याचे या नोटिसीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे दहा गावांतील शेतकर्‍यांमध्ये तीव- नाराजी पसरली आहे.

एक वर्षापासून चौपट भरपाई, उदगाव बायपास महामार्गावरून मार्ग न्यावा, यांसह अनेक मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी आंदोलन केल्याने वाद सुरू आहे. सध्या या मार्गाचे नव्याने राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. या मार्गात चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, उमळवाड, उदगाव या गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी हस्तांतरित होणार आहेत. राजपत्र प्रसिद्ध करण्याच्या तिसर्‍या प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन विभागात हरकती दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हरकती दाखल केल्यानंतर सुनावणी होण्यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने चोकाक आणि माणगाववाडी येथील शेतकर्‍यांच्या मोजणीच्या नोटिसा बजावल्या. यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना न्याय देण्याची गरज आहे. एकीकडे राष्ट्रीय प्राधिकरण आणि दुसरीकडे शेतकरी असा लढा गेल्या वर्षभरापासून सुरू असून शेतकर्‍यांसाठी लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची मागणी आहे.