वीज, पेट्रोल, एलईडी टीव्ही… सर्व वस्तू होणार महाग! रुपया घसरल्याने बजेट बिघडणार, महागाई वाढणार

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत आहे. आज एक डॉलर 88 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. रुपयाचा हा आतापर्यंतचा नीचांक आहे. रुपयाच्या घसरणीमुळे देशात महागाई वाढू शकते. येत्या काही दिवसांत विजेपासून ते पेट्रोल, डिझेल, एलईडी टीव्ही, सोलर पॅनल आदी सर्व काही महाग होऊ शकते. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काबाबत नवी घोषणा केली आहे. स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25 टक्के दर लावण्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचा परिणाम भारतावरही दिसू शकतो.

ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे बाजारात अस्वस्थता आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांच्या या हालचालीमुळे रुपयावरही दबाव वाढला आहे. एलकेपी सिक्युरिटीजचे जतीन त्रिवेदी यांच्या मते, बजेट आणि आरबीआयच्या धोरणानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी सतत पैसे काढून घेतल्याने रुपया कमकुवत झाला आहे.

रुपयाच्या घसरणीमुळे देशातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. आणि काहींच्या किमती येत्या काळात वाढू शकतात. यामध्ये वीज, पेट्रोल, डिझेल, सौर पॅनेल, कार, इलेक्ट्रिक वाहने इत्यादींचा समावेश आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, हायर कंपनीने एसीच्या किमतीत 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनी पुढच्या महिन्यात एलईडी टीव्हीच्या किमतीही वाढवू शकते. विविध कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हीच्या किमती 5 टक्क्यांनी वाढू शकतात.

भारत परदेशातून पेट्रोल, डिझेल, सौर पॅनेल, टीव्ही पॅनेल इत्यादी वस्तू आयात करतो. या वस्तू आपण डॉलरमध्ये खरेदी करतो. रुपयात घसरण होत असल्याने या वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे कंपनीवर आर्थिक बोजा पडतो. हा आर्थिक भार कमी करण्यासाठी कंपन्या बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढवतात.

अनेक कंपन्या वीज निर्मितीसाठी इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात कोळसा खरेदी करतात. त्याचे पेमेंटही डॉलरमध्ये करावे लागते. आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्या विजेच्या दरात वाढ करू शकतात.

तसेच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी बनवण्यासाठी अनेक भाग आयात केले जातात. यासाठी कंपन्या जास्त पैसेही देत आहेत. अशा परिस्थितीत या कंपन्या नुकसान भरून काढण्यासाठी किंमती वाढवू शकतात.