हद्दवाढीस तीव्र शब्दात विरोध, जबरदस्तीने हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केल्यास कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील हद्दवाढीचा मुद्दा खूपच जोर धरत आहे. याला अनेक गावातील लोकांचा विरोध तर अनेकांनी याला संमती दर्शवली आहे. पुलाची शिरोली येथे हद्दवाढ विरोधी कृती समितीची बैठक पार पडली. महापालिकेचे कारभारी नगरसेवक व अधिकारी यांनीच कोल्हापुरातील बिल्डर लॉबीसाठी हद्द वाढीचा घाट घातला आहे. असा आरोप पुलाची शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांनी केला. यावेळी बोलताना खवरे म्हणाले की, कोल्हापूर महापालिका शहरांमध्ये नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यास सपशेल अपयशी ठरली आहे. मग हद्दवाढ करून ग्रामीण भागातील जनतेला काय न्याय देणार? असा प्रश्न खवरे यांनी उपस्थित केला. तसेच ग्रामीण भागात विकास कामांना बळकटी देण्यासाठी भरीव निधीची शासनाने तरतूद करावी.अशी मागणी शशिकांत खवरे यांनी केली.

केवळ शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील उत्पन्न, ग्रामीण भागातील गायरानाच्या जमिनी यावर डोळा ठेवूनच कोल्हापूर जिल्ह्यातील काही लोकांचा  हद्दवाढीचा हट्टाहास सुरू आहे. आम्ही ग्राम पंचायतीच्या माध्यमातून खेडेगावात पायाभूत सुविधा देण्यास सक्षम आहोत. तसेच ग्रामीण भागातील जनता ही कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला तीव्र विरोध करत आहे. याचा महायुती सरकारने विचार करावा व जबरदस्तीने हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केल्यास कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी दिला.

याप्रसंगी वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले यांनी हद्दवाढीस तीव्र शब्दात विरोध दर्शवला. याप्रसंगी सरपंच अमर पाटील शिंगणापूर सरपंच सौ. शितल कदम शिये, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते,राजेंद्र सुतार, अतुल शिंदे, कपिल सावंत, विश्वास गुरव , उत्तम आंबवडेकर, संदीप पाटोळे, निवास तायमाले, संग्राम पाटील, शामराव यादव, श्रीधर कदम, संदीप कुंभार, सुरज पाटील आदीसह कृती समितीचे निमंत्रक पदाधिकारी उपस्थित होते. आभार बाजीराव सातपुते यांनी मानले.