सध्याच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली आहे. खून, मारामारी, अवैद्य धंदे यात भरमसाठ वाढ होऊन नागरिकांच्या राहणीमानात भीती पसरली आहे. अलीकडे तर विनयभंगाच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे मुली, महिलांचे जीवन धोक्यात आलेले आहे. हातकणंगले तालुक्यात असाच एक अशोभनीय प्रकार उघडकीस आलेला आहे. आळते येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अशोभनीय कृत्य केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. प्रविण रामचंद्र जाधव (वय वर्ष ३३ रा. चापोडी महोडे, राशिवडे ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे संशयित आरोपीचे नांव असून पीडित बालिकेचा तो नातेवाईक आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात सुरू होते.
डीवायएसपी रोहिणी सोळंके यांनी हातकणंगले पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेऊन तपास जलद गतीने करण्याचे आदेश दिले. पुढील तपास पीएसआय शैलजा पाटील करीत आहेत. पोलिसातून मिळाली माहिती अशी की, नराधम संशयित आरोपी प्रविण जाधव हा विवाहित असून त्याला नऊ वर्षाचा मुलगा आहे. त्याची पत्नी माहेरी म्हाळुंगे गावी राहत असून संशयित आरोपी हातकणंगले येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता तो आळते येथील नातेवाईकांच्या घरी आला.
त्यानंतर नातेवाईकांनी त्याला जेवायला घातले. जेवून झाल्यानंतर तो झोपायला दुसऱ्या खोलीत गेला. दुपारी दीड वाजता पाच वर्षाच्या बालिकेला इकडे ये म्हणून त्यांने हाक मारली व छेडछाड करून अशोभनीय कृत्य करून अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बालिकेच्या आईने चालू असलेला प्रकार तात्काळ सासऱ्याला सांगितला. सासऱ्याने त्याला घरातून बाहेर हाकलत शेजाऱ्यांना सांगितला. त्यानंतर शेजारील लोकांनी संशयित आरोपी जाधव याला ताब्यात घेऊन जाब विचारला व त्याला हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरापर्यंत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नराधम संशयित आरोपी प्रविण जाधव हा पंधरा दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या घरी आला होता. त्यावेळी सुद्धा जेवण झाल्यानंतर त्याने दुसऱ्या बालिकेसोबत असा अशोभनीय प्रकार केला होता. मात्र संशयित आरोपी जाधव हा नातेवाईक असून प्रकरण वाढू नये व नात्यांमध्ये दुरावा येऊ नये. या कारणास्तव नातेवाईकांनी त्याला ताकीद देऊन सोडून दिले होते. पण नराधमाने पुन्हा तोच प्रकार त्यांच्या घरात केला.
