मोबाईल रिचार्ज आता स्वस्त होणार, ट्रायच्या नवीन नियमामुळे ग्राहकांना दिलासा

तुम्ही महागड्या मोबाईल रिचार्ज प्लॅनमुळे त्रस्त आहात का? तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India), ट्रायने (TRAI) 120 कोटींहून अधिक मोबाईल वापरकर्त्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे तुमचा मोबाईल वापरण्याचा अनुभव अधिक सोपा, स्वस्त आणि सुविधाजनक होईल. ट्रायने (TRAI) घेतलेल्या या निर्णयामुळे, विशेषतः व्हॉइस आणि एसएमएस सेवा वापरणाऱ्यांसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध होतील. कंपन्यांना विविध किंमतीचे टॉप-अप व्हाउचर्स सादर करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.

हे नवीन नियम मोबाईल वापरकर्त्यांना अनेक फायदे देतील. रिचार्ज प्लॅनच्या किंमती कमी होण्यास मदत होईल, तसेच वापरकर्त्यांना आपल्या गरजेनुसार प्लॅन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. आता 2G फीचर फोन वापरणाऱ्यांसाठी व्हॉइस आणि एसएमएस सेवांसाठी विशेष टॅरिफ व्हाउचर (Special Tariff Voucher) (STV) घेणे आवश्यक करण्यात आले आहे. हा नियम प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना फक्त व्हॉइस आणि एसएमएस सेवा हवी आहे, त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.

या व्हाउचरची वैधता 90 दिवसांवरून वाढवून 365 दिवस (एक वर्ष) करण्यात आली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. 10 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरची आवश्यकता कायम ठेवण्यात आली आहे, पण आता दूरसंचार कंपन्यांना इतर मूल्यांचे टॉप-अप व्हाउचर्स देण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कंपन्या वापरकर्त्यांना अधिक पर्याय देऊ शकतील.