सिनेसृष्टीतील सगळ्यात महागडं गाणं; 7 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये

2.o चित्रपटातलं गाणं

रजनीकांत यांचा 2.o हा चित्रपट (cinema) 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. तो एक सायन्स-फिक्शन म्हणजेच विज्ञानकथा प्रकारातला चित्रपट होता. ज्यामध्ये तंत्रज्ञान, रोबोट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टींचा समावेश होता. हे गाणं चित्रपटाच्या प्रमुख कलाकारांवर चित्रित केलं आहे. त्यामध्ये तांत्रिक बारकावे आणि CGI चा प्रभाव पाहायला मिळतो. हे गाणं चित्रित करताना निर्मात्यांनी जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्स, सेट डिझाईन आणि कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी वापरली. त्यामुळे ते केवळ एक गाणं न राहता एक दृश्य अनुभव बनून गेलं. गाणं रिलीज होताच त्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आणि संगीतप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरलं.

20 कोटी रुपयांचा खर्च, संगीतकाराने दिला जादूई स्पर्श

या गाण्याला ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. त्यांच्या नावावर अनेक सुपरहिट गाणी आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. या गाण्याला आवाज दिला आहे दोन दमदार गायक-गायिकांनी- अरमान मलिक आणि शाशा तिरुपती. या गाण्याचे बोल लिहिले आहेत मदन कार्की यांनी. गाण्याचे संगीत, त्यातील भावना आणि अत्याधुनिक म्युझिक प्रॉडक्शन ऐकणाऱ्याला जणू एखाद्या जादुई दुनियेत घेऊन जाते. हे गाणं तयार करण्यासाठी जवळपास 20 कोटी रुपयांचा खर्च आला होता. एवढ्या बजेटमध्ये बॉलिवूडमध्ये एखादा स्वतंत्र चित्रपटही सहज तयार केला जाऊ शकतो. त्यामुळेच हे गाणं भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या गाण्यांपैकी एक मानलं जातं.

या गाण्याचा भाग असलेल्या चित्रपटाचं (cinema) दिग्दर्शन दक्षिणेतील प्रसिद्ध आणि कल्पक दिग्दर्शक एस. शंकर यांनी केलं. यात भारतीय सिनेसृष्टीतील दोन सुपरस्टार कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये होते. त्यातील एक दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, तर दुसरा बॉलिवूडचा एक आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार, जो या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाचं बजेट जवळपास 570 कोटी रुपये इतकं होतं आणि तो भारतातील सर्वाधिक खर्चिक चित्रपटांपैकी एक ठरला. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटानं 800 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.