अनेक भागात देवी देवतांच्या यात्रा गावोगावी भरविल्या जातात. कामानिमित्त परगावी गेलेले लोक देखील गावाकडे यात्रेनिमित्त येत राहतात. इचलकरंजी नजीक असणाऱ्या चंदूर ओढ्याजवळ फारणे यांच्या मालकीची २४ गुंठे जागा आहे. याठिकाणी छोटा दर्गा असून याठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी बेकायदेशीररित्या उरूस भरवला जाणार होता. यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बुधवारी घटनास्थळी धडक दिली. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंडप काढून घेण्यास भाग पाडले. तसेच विद्युत रोषणाईही काढण्यास लावल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली.
चंदूर रस्त्यावरील ओढ्याजवळ नियमबाह्य पध्दतीने भरवल्या जाणाऱ्या उरुसाला शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. येथे थडग्या भोवतालची विद्युत रोषणाई आणि मंडप काढण्यास कार्यकर्त्यांनी भाग पाडले. तणावपूर्ण वातावरण झाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्यासह पोलीस निरीक्षक सचीन पाटील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर याठिकाणी आयोजित करण्यात आलेला उरूस रद्द करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे शिवजी व्यास, बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, सनतकुमार दायमा, विशाल माळी, मुकेश चोथे, मुकेश उरुणकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थडगे हटविण्यावरुन वादावादी
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जागा मालक, उरूस आयोजक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी चर्चा करत शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, या ठिकाणी असलेले बेकायदेशीर थडगे हटवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावरून दोन्ही गटांमध्ये पुन्हा जोरदार वादावादी झाली आणि काही झटापटही झाली. अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली.