इचलकरंजीत रविवारपासून मोफत महाआरोग्य शिबीर!

इचलकरंजी येथील श्री बालाजी सोशल फाडेशनच्या वतीने आणि अलायन्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, जनरल प्रॅक्टिशनर्स असोशिएशन ऑफ इचलकरंजी, श्री टेके आय केअर हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने इचलकरंजीतील समस्त नागरिकांसाठी रविवार १० मार्च आणि सोमवार ११ मार्च असे दोन दिवस मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विक्रमनगर परिसरातील श्री बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हे महाआरोग्य शिबीर सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. या शिबीरात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार, मूत्रविकार, डोळ्यांचे विकार, स्त्रियांचे विकार, कॅन्सर लक्षणे व हाडांचे विकार याची तपासणी केली जाणार आहे. गरज पडल्यास सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.

तसेच मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच संपूर्ण आरोग्य तपासणी ही मोफत केली जाणार असून मोफत चष्मे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन केले जाणार आहे. गरजूंना शासकीय योजना अंतर्गत उपचार, शस्त्रक्रिया मोफत तसेच आवश्यक चाचण्या सवलतीच्या दरात मिळणार आहेत. महाआरोग्य शिबीराचे हे पहिलेच वर्ष असून हा उपक्रम सातत्याने राबविला जाणार आहे. मागील १६ वर्षापासून चैत्र पाडवा साजरा केला जातो.

त्याचबरोबर आता महाआरोग्य शिबीर, सांस्कृतिक व खेळ असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे श्री. कारंडे यांनी सांगितले. या महाआरोग्य शिबीराचा गरजू नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.