सध्या अनेक भागात गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ झालेली आहे. राजेरोसपणे अवैद्य धंदे सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसतच आहे. विटा येथे एमडी ड्रग्ज सापडल्याने देखील नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, तसेच विटा शहरातील गुन्हेगारी आणि अवैद्य व्यवसाय मोडून काढा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून गुन्हेगारी मोडीत काढू, असा खणखणीत इशारा विटा शहरातील शेकडो नागरिकांनी गुरूवारी प्रशासनाला दिला. विटा येथील जिओ न्यूज चॅनेल या यूट्यूब चैनल चे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर मंगळवारी रात्री कोयता आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात प्रसाद पिसाळ यांच्यासह त्यांच्या सहकर्मचारी सुषमा जोशी या देखील जखमी झाल्या. या घटनेचे संतप्त पडसाद संपूर्ण सांगली जिल्ह्यात उमटले. सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने राज्यभरात या घटनेचा निषेध नोंदवत हल्लेखोरावर कडक कारवाई करावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विटा येथील पत्रकारावरील झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना या घटनेच्या बाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
