जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून, फ्रेंड सर्कलमधून कोणी शासकीय सेवा देत असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.खरे तर हे चालू 2023 वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहिले आहे. या चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 8 टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान या चालू वर्षाची येत्या काही दिवसात सांगता होणार आहे.अवघ्या 13 ते 14 दिवसांच्या काळात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. आपण सर्वजण 2024 चे स्वागत करणार आहोत. नवीन वर्षात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. सर्वात आधी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहतील आणि त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका राहणार आहेत.
अशा परिस्थितीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्रशासन नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणार असे वृत्त समोर आले आहे.
खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो.जानेवारी ते जून या पहिल्या सहामाहीसाठी आणि जुलै ते डिसेंबर या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता वाढवला जातो. पण पहिल्या सहामाहीचा महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा साधारणता मार्च महिन्यात केली जाते.
यंदा मात्र निवडणुकीचा काळ पाहता ही घोषणा मार्च महिन्याच्या आधीच होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागेल असा अंदाज असल्याने यापूर्वीच याबाबतची घोषणा शासनाला करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे सध्या कार्यरत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या 50 लाखांच्या घरात आणि पेन्शन धारकांची संख्या 60 लाखाच्या घरात आहे. म्हणजे जवळपास एक कोटी वोट बँक ही कर्मचाऱ्यांची आहे. अशा परिस्थितीत या लोकांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
किती वाढणार DA
AICPI निर्देशांकाच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार, निर्देशांक 138.4 अंकांवर आला आहे. महिनाभरापूर्वीच्या तुलनेत निर्देशांकात ०.९ अंकांची वाढ आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीची प्रतीक्षा असली तरी आतापर्यंतचा पॅटर्न पाहता, जानेवारी ते जून २०२४ या कालावधीतील महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ दिसून येईल असा अंदाज आहे.
यामुळे तज्ञ लोकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पाच टक्के महागाई भत्ता वाढू शकतो असे सांगितले आहे. जानेवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी महागाई भत्ता म्हणजेच डीए 5 टक्क्यांनी वाढवला जाईल असे सांगितले जात आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ५० टक्क्यांच्या पुढे जाणार आहे आणि यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा HRA म्हणजेच घरभाडे भत्ता (HRA) सुद्धा वाढणार आहे.