हुपरीच्या यात्रेतील कर आकारणीचा मुद्दा चिघळला….

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. यात्रा शांततेत भरविण्याचा यात्रा कमिटीचा प्रयत्न असतो. देवीदेवतांच्या दर्शनासाठी परगावहून भाविक गावाकडे यात असतात. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील श्री अंबाबाई देवीची यात्रा देखील दरवर्षी अगदी मोठ्या उत्साहात भरवली जाते. हुपरी शहराची वरदायिनी श्री अंबाबाई देवीची यात्रेतील कराचा मुद्दा चिघळला आहे. यात्रा कमिटी, पोलिस प्रशासन, महसूल व नगरपरिषद विभागाच्या असंख्य चर्चेच्या फेऱ्या झडल्या मात्र तोडगा काहीच निघाला नाही.

नगरपरिषदेतील संयुक्त बैठकीत आम. अशोकराव माने यांनी पुर्वीच्या पद्धतीने कर गोळा करून सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले. मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान शनिवारी हपरी शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडून आला नाही. नगरपरिषदेने कर आकारणीचा ठेका दिल्याने यात्राकाळात कर आकारणीचा व महसूल गोळा करण्याच्या कारणांवरून यात्रा कमिटी व खाजगी ठेकेदार यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.

मुख्याधिकारी पोलिस प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत आम. डॉ. अशोकराव माने यांनी पुर्वी प्रमाणे ठरलेल्या दरातच विभागून कर गोळा करा व पाळण्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार नाहीत याची काळजी घेण्याचा मार्ग सुचविला मात्र यातून मार्ग निघाला नाही. आता यामध्ये जुन्या आठवणी व वादाचे स्वरूप पहायला मिळते.

यशवंत पाटील, माजी सरपंच सुभाष कागले, शिवसेनेचे अजित सुतार, राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे बाहुबली गाठ, पृथ्वीराज गायकवाड, साताप्पा गायकवाड यांच्यासह बहुतांश लोक यात्रा कमिटीच्या बाजूने तर ठेकेदार रणजीत बिरांजे, लखन कोरवी, विक्रम काटकर यांच्या समर्थनार्थ नगरसेवक दौलतराव पाटील, दिनकरराव ससे, नेताजी निकम, किरण पोतदार, मानसिंग देसाई यांच्यासह इतर मान्यवर उभे राहिले आहेत. यामुळे कर वसूलीचा प्रवास आता ग्रामपंचायत काळातील राजकीय वळणावर येऊन ठेपला आहे. दोन्ही बाजूंनी करवसुली केली तर सामान्य माणसाला यात्रा खिशाला परवडणारी नाही याकरिता संबंधित यंत्रणांनी हा गंभीर मुद्दा समन्वयाने सोडवण्याची गरज आहे.

हुतात्मा स्मारक पटांगणावर कर वसूली करणार व आलेल्या पाळण्याना बाहेर काढणार नाही असा पवित्रा ठेकेदाराने घेतल्याने तर यात्रा कमिटीचे अध्यक्ष यशवंतराव पाटील यांनी या जागेसाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. पुर्व परंपरागत ग्रामस्थांना यात्रा भरवण्याचा अधिकार आहे आणि तो आमचा हक्क आहे. यामध्ये ढवळाढवळ चालणार नाही यापूर्वीच पाळणे ठरविले आहेत यामुळे ग्राउंड रिकामे करण्याची मागणी केली. 

दिवसभर मुख्याधिकारी अजय नरळे, प्रशासकीय अधिकारी प्रशांत तराळ, पीआय निंगापा चौखंडे, हुपरी सर्कल प्रदिप शिंदे, तलाठी एस.पी. जाधव, जुने पोलीस पाटील काका पाटील, लिपीक मिरा शिंगे, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सोबत चर्चेच्या फेऱ्या झडल्या मात्र तोडगा निघाला नाही. अखेर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी संध्याकाळी कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही फारसे यश मिळाले नाही.

अखेर आता कर वसूलीचा चेंडू जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कोर्टात गेल्याने पुढे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या ग्रामस्थांनी रास्तारोकोचा इशारा दिला होता मात्र जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याचे कारणास्तव पोलिस प्रशासनाने याला परवानगी नाकारल्याने बंद स्थागित करण्यात आला असून सर्व व्यवहार सुरू झाले आहेत.