इस्लामपुरात ‘बिझनेस एक्स्पो’ ची जय्यत तयारी……

प्रत्येक भागात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जेणेकरून त्याचा लाभ नागरिकांना, व्यवसायिकांना घेता येतो. इस्लामपूर शहर परिसराच्या औद्योगिक, व्यावसायिक विकासाला चालना देणे, स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांना व्यवसाय मिळवून देण्याच्या उद्देशाने इस्लामपूर बिजनेस फोरम (आयबीएफ) ची स्थापना केली आहे. सर्व उद्योगांचे एकाच छताखाली होणारे व्यावसायिक प्रदर्शन आणि त्यासोबतच कला, उद्योग, राजकारण व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या आयबीएफ एक्स्पोची जय्यत तयारी सुरू आहे. उद्घाटन समारंभासाठी येणारे अभिनेते नाना पाटेकर आणि मान्यवरांमुळे आकर्षण निर्माण झाले आहे.

इस्लामपूर बिझनेस फोरम (आयबीएफ) तर्फे १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान आमदार जयंत पाटील खुले नाट्यगृह येथे बिझनेस एक्स्पो २०२५ या व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. चार दिवस होणाऱ्या व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन केले आहे. भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. सिनेअभिनेते नाना पाटेकर हे उद्घाटक तर आ.जयंतराव पाटील अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

इस्लामपूर बिजनेस फोरमचे संस्थापक प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष विकास राजमाने, उपाध्यक्ष प्रवीण फल्ले, नवाज पटवेकर यांच्यासह कोअर कमिटी सदस्य संयोजन करत आहेत.सुमारे २५ ते ५० हजार नागरिकांनी व्यावसायिक प्रदर्शनाला भेट द्यावी तसेच सुमारे १० कोटी रुपयांची उलाढाल व्हावी या दृष्टीने नियोजन सुरू आहे. नवीन संकल्पना असलेल्या उद्योगांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे आहेत. शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिक, युवक व विद्यार्थ्यांनी व्यवसाय प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.