सध्या प्रत्येक गावात अनेक कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये मनोरंजन तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच अनेक विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात. यामध्ये बैलगाडी, घोडागाडी त्याचप्रमाणे अनेक भागात जंगी कुस्त्या देखील घेतल्या जातात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती यात्रेनिमित्त खानापूर तालुक्यातील अगस्तीनगर येथे भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवार दिनांक १८ रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच दाजीभाऊ पवार यांनी दिली. यावेळी प्रथम क्रमांकासाठी सरपंच किताब केसरीसाठी पै. विक्रमकुमार हरियाणा व पैलवान जलाल इराणी यांच्यात लढत होणार आहे.
तर द्वितीय क्रमांकासाठी पै. पागल बाबा व पै. अब्दुल्ला पश्चिम बंगाल यांच्यात टक्कर होणार आहे. या कुस्त्यांसाठी अनुक्रमे दोन लाख ५१ हजार व दोन लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. यासह अनेक कुस्त्याही होणार आहेत.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, खासदार माजी संजयकाका पाटील, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या जंगी कुस्त्यांचा लाभ घ्यावा असे अगस्तीनगरच्या ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.
