सांगोला उपसा सिंचन योजनेला पळशीच्या शेतकऱ्यांचा विरोध! बाधित जमिनीला पाच पट मोबदल्याची मागणी

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमापूर्वीच शेतकरी सरकारच्या व या योजनेच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. सरकारने आधी नुकसान भरपाई द्यावी मगच काम सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकरी नेते मारूती जाधव यांनी दिला आहे.

या योजनेसाठी पळशी येथे उजनी उजवा कालव्या जवळ पंप हाऊस उभारण्यात येणार आहे. येथून पाईप लाईन टाकून सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे पाणी आणण्यात येणार आहे. या योजनेतून दुष्काळी १२ गावांना पाणी मिळणार आहे.दरम्यान या योजनेसाठी पळशी‌ येथील सुमारे शंभर ते दीडशे शेतकर्यांची जमिन बाधीत झाली आहे. सध्या जमिन भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. येथील शेतकर्यांनी आज संपादीत जमिनीला पाच पट मोबदला मिळावा अशी मागणी करत योजनेला विरोध केला आहे. शेतकर्यांच्या विरोधामुळे या योजनेला खिळ बसवण्याची शक्यता आहे.

सांगोला उपसा सिंचन योजनेला पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांनी विरोध केला आहे. योजनेसाठी बाधित होणार्या जमिनीला पाच मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. आधी दाम नंतर काम अशी भूमिका घेत येथील बाधित शेतकर्यांनी आज पळशी येथे अर्धनग्न आंदोलन केले. भूमिपूजन होण्यापूर्वीच शेतकर्यांनी विरोध केल्याने खळबळ उडाली आहे.