राज्यात जीबीएस बाधीत रुग्णांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच, महूद येथे पहिला जीबीएस रुग्ण सापडल्याने सांगोला तालुक्यातही भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील गावांमध्ये घरोघरी जाऊन तपासणी व सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असल्याने सांगोला तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ही सतर्क असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर गावातील गटार व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतेची पाहणी आणि पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था काटेकोरपणे करण्याबाबतच्या सक्त सूचना पं.स.चे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांनी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या आहेत. जीबीएस आजाराबाबतचे वेळीच गांभीर्य ओळखून न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ, पुणे यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई व प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी अंमलबजावणी सुरु केली आहे. तर, अचानक हाताला व पायाला अशक्तपणा येणे, मुंग्या येणे, कमजोर वाटणे इत्यादी लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या सरकारी दवाखान्यात तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन महूदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण ढाळे यांनी केले आहे.