उद्यापासून दहावी परीक्षेला सुरुवात, विद्यार्थ्यांनो अशी घ्या काळजी!

इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारी (दि. २१) फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. परीक्षा म्हटले की, विद्यार्थ्यांच्या मनात धडकी भरते, लिहिण्याची गती मंदावते, विद्यार्थ्याच्या मनात ताणतणाव आणि भीती असते, अशा नकारात्मक परिस्थितीला बाजूला सारून विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना तणावमुक्त व भयमुक्त व्हावे, परीक्षेचे पेपर कसे असतील?मला सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहीता येतील का परीक्षेसाठी वेळ पुरेल का?पेपर सोपा असेल, की अवघड?परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी आणि पालकांना पडणाऱ्या अशा अनेक प्रश्नांचे निरसन शिक्षण मंडळी व समुपदेशकांनी करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बिनधास्त कसे सामोरे जायचे, याचा कानमंत्र…..

गैरमार्गाचा वापर टाळा

उद्यापासून (शुक्रवारी) दहावीची परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात. यासाठी प्रत्येक तीन ब्लॉक पाठीमागे एक झाडाझडती पथक, एक बैठे पथक कार्यरत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा वापर करू नये. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना कुठलेही दडपण न बाळगता परीक्षा द्यावी. परीक्षेचा बदल लक्षात घेता वेळेत केंद्रावर पोहोचावे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी.

लिखाणाचे तंत्र समजून घ्यावे

परीक्षा ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी राहावा यासाठी पालकांनी सहकार्य करावे. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकांचे आराखडे, प्रश्नाचे स्वरूप निर्धारित गुणांकन, लिखाणाचे तंत्र समजून घ्यावे. संतुलित आहार, पुरेशी झोप शक्य असल्यास हलके व्यायाम व मेडिटेशन करावे.

अर्ध्या तासापूर्वी केंद्रावर पोहोचा

परीक्षा केंद्रात जाताना हॉल तिकीट, स्वतःची पाण्याची बॉटली सोबत ठेवावी. लेखन साहित्य (उदा. पेन, पेन्सिल, एक्झाम पॅड, कंपास इत्यादी) स्वतः सोबत आणणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात अर्धा तासापूर्वी पोहोचावे. जेणेकरून पेपरच्या वेळी अडचण होणार नाही.

विद्यार्थ्यांनी गोंधळू नये

यंदा परीक्षा मंडळाने १० मिनिटापूर्वी प्रश्नपत्रिका देण्याची सोय होती. ती मोडून ते दहा मिनिटे परीक्षेच्या शेवटच्या वेळी देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी निर्भयपणे शांत होऊन आपण वर्षभर केलेला अभ्यास परीक्षेतून मांडावा. परीक्षेची वेळी अनेकदा विद्यार्थी गोंधळतात. त्यांनी गोंधळू नये.

कॉपी करू नये

परीक्षेदरम्यानच्या या कालावधीत पालकांनी पाल्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधावा. त्यांच्यावर अवाजही अपेक्षांचा भार लादू नये. घरातील वातावरण अभ्यासपूरक व शांत राहील याची काळजी घ्यावी. अभ्यासानंतर उजळणीवर भर द्यावा आणि परीक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये.

पालक शिक्षकांनी सहकार्य करावे

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आपण कॉपीमुक्त अभियान राबवित आहोत. परीक्षा मंडळाने या संदर्भात केलेल्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन विद्यार्थ्यांनी करावे. दिलेल्या सुचनांचे जाणीवपूर्वक वाचन करून तणावमुक्त व भयमुक्त वातावरणातून परीक्षा द्यावी, यश आपल्या पाठीशी आहे. पालक, शिक्षक यांनीही कॉपीमुक्त अभियानाला सहकार्य करावे.