इचलकरंजी पॉवरलुम असो.चे मजूरी वाढीसंदर्भात संयुक्त बैठक घेण्याचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन 

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात यंत्रमाग कारखानदारांची संख्या खूपच आहे. सहाय्यक कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांना एकतर्फी मजुरीवाढ जाहीर केली आहे. या मजुरीवाढीला यंत्रमागधारक संघटनांचा विरोध असल्याने कारखाना पातळीवर वाद विवाद होत आहेत. गावातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत आहे. त्यामुळे ट्रेडिंग कंपनी चालक असो. आणि यंत्रमागधारक संघटनांची मजूरी वाढीसंदर्भात संदर्भात संयुक्त बैठक घेण्याची मागणी इचलकरंजी पॉवरलूम असो. ने सहाय्यक कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यंत्रमाग कामगारांच्या मजूरीवाढीस सर्व यंत्रमागधारक संघटनांचा विरोध आहे. तरीही सहाय्यक कामगार आयुक्त एकतर्फी मजूरीवाढ जाहीर करत असल्याने २०१६ पासून यंत्रमागधारक संघटना मजुरी वाढीच्या करारातून बाहेर पडल्या आहेत. २०१३ पासून ट्रेडिंग कंपनी चालक कोणतीही मजूरीवाढ देण्यास तयार नाहीत किंवा ते चर्चेलाही येत नाहीत. मात्र, प्रशासन एकतर्फी कामगारांची बाजू घेऊन मजूरी वाढ जाहीर करते. मजूरीने बिमे आणून कापड 
विणणाऱ्या कारखानदारांची बाजू प्रशासन घेत नाही किंवा ऐकूणही घेत नाही. त्यामुळे जरी दरवर्षी मजूरीवाढ जाहीर झाली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही.

ट्रेडिंग कंपनीकडून यंत्रमागधारकांना मजूरी वाढवून मिळत नाही. परिणामी यंत्रमागधारक कामगारांना मजूरी वाढवून देत नाहीत.संपूर्ण महाराष्ट्रात केवळ इचलकरंजीतच अशी कामगारांच्या मजूरीवाढीची घोषणा होते. इचलकरंजीपेक्षा मोठ्या असलेल्या भिवंडी, मालेगांवमध्ये कामगार मजूरीत वाढ होत नसल्याने इचलकरंजीतील उत्पादन खर्च वाढत आहे. उत्पादन खर्च वाढल्यावर कापडास मागणी येत नसल्याने गावात मंदीचे वातावरण तयार होते. सहाय्यक कामगार आयुक्त एकतर्फी मजूरी वाढ जाहीर करत असल्याने कारखाना पातळीवर वाद विवाद होत आहेत. गावातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत आहे. त्यामुळे ट्रेडिंग कंपनी चालक असो. आणि यंत्रमागधारक संघटनांची मजूरी वाढीसंदर्भात बैठक घडवून आणण्याची जबाबदारी सहाय्यक कामगार आयुक्तांची आहे. असे इचलकरंजी पॉवरलुम असो. चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.