इचलकरंजी शासनाचा महसूल बुडविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी एकाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. असीम चांदसाहब मुजावर (वय ३२, रा. मुजावर गल्ली, कवठेपिरान, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबतची फिर्याद सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय गणपती इंगवले (वय ५६) यांनी पोलिसांत दिली आहे.
मुजावर याने प्रादेशिक कार्यालयात ट्रक तपासणीसाठी आणला होता. ट्रकचे निरीक्षण करून कागदपत्रे तपासली असता वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र हे मूळ नसून फोटो प्रिंट असल्याचे समोर आले. यावेळी सखोल तपासणी केली असता वाहनाची चेस बदलून त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले.