हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजीचा सूर! विधानसभेला कोणती भूमिका घेणार

इचलकरंजीत भाजप रुजवलेल्या हाळवणकर यांना डावलने शक्य नव्हते त्यामुळे त्यांच्या सहमतीशिवाय आवाडेंना प्रवेश देता येणार नाही हे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला माहिती होते. म्हणूनच गेली साडेचार वर्षे आवाडे यांचा प्रवेश रखडलेला होता. यावर पर्याय म्हणून राज्यपाल नियुक्ती 12 आमदारांमध्ये पहिल्या पसंतीला हाळवणकर यांचे नाव असेल असे भाजपच्या गोटातून वारंवार सांगण्यात येत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महिन्याभरपूर्वी हाळवणकर यांना फोनवरून तुम्हाला लवकरच चांगली संधी मिळणार असल्याचे सांगून विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याचे संकेत देखील दिलेले होते. यामुळे हळवणकर समर्थक देखील चांगलेच खुश झालेले होते.

परंतु आचारसंहितापूर्वी महायुतीने राज्यपाल नियुक्त सात आमदारांची यादी प्रसिद्ध केली. पण भाजपने दिलेल्या यादीत हाळवणकर यांचे नाव कुठेच नव्हते. त्यामुळे हाळवणकर समर्थकांचा रोष कमी करून केवळ आवाडे यांना भाजप प्रवेश देण्यापुरता हा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी रचलेला कट होता का? असा प्रश्न सध्या इचलकरंजीतील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडलेला आहे. त्यामुळे आता विधानसभेला हे निष्ठावंत कार्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.