इस्लामपूर शहरात सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास!

सध्या अनेक भागात गुन्हेगारी प्रकारात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अलीकडे तर दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इस्लामपूर शहरातील केएनपी नगर रस्ता क्रमांक ८ परिसरातील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि साडे तीन तोळे वजनाच्या बांगड्या, चांदीची नाणी अशा २ लाख ३० हजारांच्या ऐवजाची चोरी केली. ही घटना मंगळवारी सकाळी ते रात्रीदरम्यान घडली. याबाबत विशाल विनायक पाटील (४६, इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.