एड्स महामारीला रोखण्यात एआरटी सेंटरचे योगदान महत्त्वाचे : डॉ. अशोक शिंदे 

सावधानता, समुपदेशन, सन्मान आणि औषधोपचाराने एड्सच्या महामारीला लगाम बसला आहे. या कामी राज्य सरकारची एड्स नियंत्रण संस्था आणि जिल्हा-तालुका स्तरावरील एआरटी सेंटर्सचे महत्त्वाचे योगदान आहे; असे प्रतिपादन डॉ. अशोक शिंदे यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालय आयसीटीसी व एआरटी विभाग यांच्या वतीने इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आयोजित जागतिक एड्स दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक शिंदे बोलत हो- ते. अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरदास होते. प्रारंभी समुपदेशक दीपक साळुंखे यांनी स्वागत केले. डॉ. अशोक शिंदे म्हणाले, सन २००० ते २०१० च्या दशकामध्ये महाराष्ट्रात मुंबईनंतर आपल्या सांगलीचे व इस्लामपूर परिसरामध्ये देखील एचआयव्ही बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. आता हीच संख्या अवघ्या ५-१० टक्यापर्यंत खाली आली आहे. यामध्ये राज्य सरकारची एड्स नियंत्रण संस्था आणि ठिकठिकाणची एआरटी सेंटर आणि तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरदास म्हणाले, एआरटी सेंटरच्या माध्यमातून रुग्णांचे चांगले समुपदेशन आणि उपचार होत आहेत.

समाज देखील एड्स प्रतिबंधासाठी सजग झाला आहे. असे सांगून डॉ. हरदास यांनी एचआयव्ही लागण कशी होते आणि ती होऊ नये, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाआधी शहरा- यशवंतराव चव्हाण महाविद्यालय एन. एस. एस. विभाग, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय एनएसएस विभाग, कासेगाव शिक्षण संस्थेच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी- विद्यार्थिनी व उपजिल्हा रुग्णालय, आणि आपली माणसं फाउंडेशन यांच्या सहयोगाने तहसील कचेरी पासून रुग्णालयापर्यंत प्रबोधन व जनजागृती अंतर्गत रॅली काढण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. आर. एच. मदने, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. नाकीब मुजावर, एआरटी सेंटरचे डॉ. श्रीगणेश पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश हवलदार, यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्रा. डॉ. गोरखनाथ किर्दत, इस्लामपुरातील आपली माणसं फाउंडेशनचे प्रवीण महाराज, मनीष जाधव, अमन संदे तसेच या विभागाचे समन्वयक अशोक शिंदे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन समुपदेशक विश्वास मागाडे यांनी तर आभार समुपदेशक राहीन शिकलगार यांनी मानले. रॅलीचे संयोजन प्रा.डॉ. किर्दत, प्रा. रासकर, प्रा.गोसावी, प्रा. अमोल चांदेकर, प्रा.क्रांती कांबळे आदींनी केले.