आटपाडी शहरात पाच दिवसातून पिण्याचा पाणीपुरवठा, पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष…..

सध्या अनेक भागात पाण्याची टंचाई जाणवते. अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाण्यासाठी अनेक भागात आंदोलन देखील केले जातात. तरीही अनेक भागातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर आता नगरपंचायतीमध्ये होऊन दोन वर्षे उलटली तरी कारभार मात्र ग्राम पंचायतीसारखाच सुरु असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दुष्काळी आटपाडी तालुका म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. टेंभू योजनेमुळे शेती व पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. त्याचे नियोजन वेळेत करणे त्या त्या विभागाचे काम आहे. उन्हाळ्यांची तिव्रता जास्त असल्यामुळे शेती व पिण्याचा पाणी प्रश्न तात्काळ सोडण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

आटपाडी नगरपंचायत होऊन दोन वर्षे पुर्ण झाली असून सध्या नगर पंचायतीचा कारभार प्रशासनाकडे आहे. शहरात लोकसंख्या विचारात पाणीपुरवठा सुरळीत होण्याबाबत अत्याप कोणताही निर्णय झालेला नाही. प्रशासनाकडून पाणीपट्टीत वाढ केली असून नागरिकांनी वेळेवर पाणीपट्टी रक्कम भरली आहे. मात्र शहराला पाणी पुरवठा हा पाच किंवा सहा दिवसांनी केला जात आहे. आता उन्हाळ्याची तिव्रता वाढत चालली असून नारिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा दररोज झाला पाहिजे. सध्या तलावात पाणी पुरेसे आहे.

तलावातील पाणी पातळी कमी झाली तर टेंभू योजनेचे पाणी तलावात भरून दिले जाते. आटपाडी शहरातील नगरपंचायतीमार्फत पाच- सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने दररोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.