आटपाडी तालुक्यातील तरूणाच्या मृत्यूप्रकरणी संशयित एक वर्षानी शरण

आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर येथील सुशांत दिलीप यादव या तरूणाच्या अपहरण मारहाण व मृत्युप्रकरणी संशयित वर्षानंतर पोलिसांना शरण आला. दिपक पांडुरंग शिंदेअसे त्यांचे नाव आहे. त्याचा दुसरा साथीदार अजून पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयितांला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. विठ्ठलापूर येथील सुशांत यादव दिघंची येथील गलाई व्यावसायिक दिपक पांडुरंग शिंदे व विलास पांडुरंग शिंदे यांच्या उत्तरप्रदेश येथे बेहराई येथील गलाई दुकानात कामास होता. गेल्या वर्षी तो जानेवारीत गावी आला. त्यांनंतर चारच दिवसात दिपक व विलास शिंदे यांनी सुशांत यादव याला घरी येऊन दुकानातील हिशेव करण्यासाठी चल म्हणून जबरदस्तीने उचलून नेले होते.

त्यानंतर सहा दिवसात सुशांतचा मृतदेह घेऊन शववाहिका गावी आली. घरच्यांना घातपाताचा संशय आल्याने त्यांनी मृतदेह स्वीकारला नाही. तीन दिवस सुशांतच्या पालकांनी पोलिस ठाण्यासमोर अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. तिसऱ्या दिवशी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आणि उत्तरीय तपासणी केल्यावर सुशांतचा मृतदेह पालकांनी स्विकारला. याप्रकरणी दिपक पांडुरंग शिंदे व विलास पांडुरंग शिंदे यांच्यावर अपहरण छळाचा गुन्हा दाखल केला होता. वर्षभर दोघेही पसार होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. आटपाडी पोलिसांनी तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची सुशांतच्या पालकाची मागणी होती.