शिवशंभो महिला प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना छावा चित्रपट विनामूल्य…..

१९ फेब्रुवारीला शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सध्या छावा चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. मंगळवेढ्यातील शिवशंभो महिला प्रतिष्ठानच्या वतीने रंगप्रभा चित्रपटगृहात सर्वत्र हाउसफुल गर्दी चालू असलेला छावा चित्रपट गुरुवारी महिलांसाठी विनामूल्य दाखवण्यात  आला.

शिवशंभो महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नियामक मंडळ सदस्या प्रा. तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने शिवशंभो महिला प्रतिष्ठान सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असते. महिलांमध्ये जनजागृती करण्याचे उपक्रम ही सातत्याने हाती घेतले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा पराक्रम महिलांना जवळून पाहता यावा हा हेतू लक्षात घेऊन सर्वत्र गाजत असलेला छावा चित्रपट खास महिलांसाठी मोफत दाखवण्याचे आयोजन वतीने केले.

गुरुवारी दुपारी अकरा वाजल्यापासून महिला पारंपारिक वेशात चित्रपटगृहासमोर उत्साहाने जमताना दिसत होत्या. दुपारी ११:३० वाजता चित्रपट गृहाच्या प्रांगणात उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस डॉ. सौ. मीनाताई कदम व प्रा तेजस्विनी कदम यांच्या हस्ते उपस्थित सर्व महिलांच्या साक्षीने दुग्धाभिषेक करून सर्व महिलांना सन्मानपूर्वक चित्रपट गृहात प्रवेश देण्यात आला.

त्यावेळी सर्व महिलांच्या चेहऱ्यावर एक उत्साह दिसून येत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय..! छत्रपती संभाजी महाराज की जय..! अशा महिलांनी केलेल्या जयघोषाने चित्रपट गृह दणाणून सोडले. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिल्याच्या प्रतिक्रिया महिलांमधून आल्या.