पंढरपूर आणि मंगळवेढेकरांचा प्रवास होणार गारेगार!

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद जोपासणाऱ्या लालपरीत प्रवाशांचा सुखकर व आरामदायी प्रवास होणार आहे. दरम्यान, यापूर्वी सोलापूर आगाराला १० ई-शिवाई बस मिळाल्या होत्या. येत्या महिनाअखेरपर्यंत पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही आगारांना ३० एअर कंडिशन्ड ईव्ही बस मिळणार असल्याने पंढरपूर आण मंगळवेढेकरांचा प्रवास गारेगार होणार आहे.
‘रस्ता तेथे बस’ असे जाळे महामंडळाने विणले आहे. खासगी बसप्रमाणे प्रवाशांना वातानुकूलित सेवा देण्याच्या अनुषंगाने ईव्ही बस महामंडळाकडून आणल्या जात आहेत.

लवकरच पंढरपूर आणि मंगळवेढा आगारातील चार्जिंग स्टेशनचे काम झाल्यानंतर पंढरपूर- पुणे, पंढरपूर-सांगली, पंढरपूर-कोल्हापूर, मंगळवेढा- पुणे, मंगळवेढा – सातारा आदी मार्गांवर ई-बस धावणार आहेत. भविष्यात ई-बसची संख्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, एस. टी. बससह इतर वाहनांमुळे प्रदूषणात होत असलेली वाढ आणि वाढत्या इंधन खर्चामुळे राज्य परिवहन महामंडळाने पर्यावरणपूरक बस आणल्या आहेत. पंढरपूर आणि मंगळवेढा येथे ३० बस येणार आहेत.