शेकापकडूनविधानसभेसाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सर्व जाती धर्मातील नागरिकांसमवेत आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ना गाजावाजा, ना शक्तीप्रदर्शन, अतिशय साध्या पध्दतीने डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी तहसील कार्यालयात काल सोमवार दि.28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांचे आशिर्वाद घेतले.
त्यानंतर सूतगिरणी येथील स्व.आबासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासमवेत मोटारसायकलवर प्रवास करत सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिकादेवीचे दर्शन घेत अत्यंत साधेपणाने तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, स्व.आबासाहेबांनी तालुक्यामध्ये नाही रे घटकांचे प्रतिनिधीत्व केले, तोच विचार टिकविण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. मागच्या 5 वर्षामध्ये परिस्थिती प्रत्येकाला जाणीव, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी ठाम राहिल, चांगले शिक्षण, शेतीचे पाणी, पिकाला, दुधाला भाव मिळाला पाहिजे हा विचार पुढे ठेवुन तालुक्याचे काम करणार आहे.
स्व.आबासाहेबांनी पुरोगामी विचार तालुक्यात टिकाविला.जनता निष्टावंत व स्वाभीमानी असल्यामुळे सांगोल्यात लाल झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त करत येणारी निवडणुक ही धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी असणार आहे. जनता विचाराला महत्व देणारी आहे. स्व.आबासाहेबांनी राजकारण समाजकारण करताना प्रशासकीय अधिकार्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली म्हणून कार्यकर्त्यांचा रेटा असताना देखील शांततेत अर्ज भरला.सांगोला तालुक भष्टाचार मुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला असून लाल बावटा फडकावून आबासाहेबांना श्रध्दांजली वाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.