कित्येक वर्षांपासून पाण्यापासून वंचित राहिलेल्या आणि सतत मागणी आणि पाठपुरावा करूनही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या माडग्याळ शिवारात अखेर म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले.
म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याचे उद्घाटन खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते घेण्यात आले. नव्याने तयार करण्यात आलेल्या कॅनॉलमध्ये पाणी सोडल्याने माडग्याळसह सोन्याळ, उटगी, निगडी बु.. हल्ली उमदी या भागाला फायदा होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
उद्घाटनप्रसंगी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून जत तालुक्यातील पूर्णतः वंचित ४८ गावे व अंशतः वंचित १७ गावांसाठी पंतप्रधान सिंचन योजनेतून मंजूर दोन हजार कोटी रुपयांची जी विस्तारित योजना आहे ती गतीने राबवून संपूर्ण जत तालुका ओलिताखाली तालुका दुष्काळमुक्त करू अशी ग्वाही खासदार पाटील यांनी दिली. माडग्याळ आणि मायथळ दरम्यान नव्याने तयार केलेल्या कॅनॉलमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी खासदार संजयकाका पाटील, आमदार विक्रमसिंह सांवत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, डीसीसी बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, डॉ रवींद्र आरळी, सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, तम्मनगौडारवी पाटील, प्रभाकर जाधव, हभप. तुकारामबाबा महाराज, म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता सचिन पवार, अभियंता खरमाटे, सरदार पाटील, प्रमोद सावंत, सुनील पवार, सरपंच सौ अनिता माळी, विठल निकम, प्रमोद सावंत (माडग्याळ) सोमन्ना हाके, लिंबाजी माळी यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार विक्रम दादा सावंत म्हणाले की, पाणी कुणी आणले यापेक्षा शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे याचे आम्हाला समाधान आहे. जत तालुक्यातील शेतकऱ्याची इंचण इंच जमीन ओलिताखाली येण्यासाठी आम्ही सर्व पक्षभेद विसरून सर्वच राजकीय पक्षाची मंडळी एकत्रित येऊन काम करत आहोत. जत तालुक्यातील सर्वच क्षेत्र ओलिताखाली येण्यास फार काळ लागणार नाही. येत्या दोन वर्षात विस्तारित योजनेचे कामही पूर्ण होऊन जत तालुक्यातील इंचण इंच जमीन ओलिथाखाली येणार आहे.
यावेळी माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, योजना तयार होऊन २७ वर्षे झाली. अजूनही पूर्णत्वास आली नाही. विस्तारित योजनेचे संपूर्ण कामाचे टेंडर काढून कामाला सुरू करावे. आपापसातील पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन या योजनेची कामे पूर्ण होण्यासाठी सर्वांनी एकसाथ येण्याचे व लढण्याचे आवाहन जगताप यांनी केले.