लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोलले अशोक सराफ, म्हणाले…..

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. खलनायकी भूमिका असो किंवा विनोदी त्यांनी प्रत्येकच भूमिका इतक्या उत्तम पद्धतीने साकारली की त्या भूमिका अजरामर ठरल्या.त्यांची विशेष जोडी जमली ती अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत. मराठी सिनेसृष्टीतील दोन हिरे म्हणून या जोडीची ओळख होती. मात्र लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर ही जोडी तुटली. लक्ष्मीकांत यांचं निधन हा आपल्यासाठी मोठा धक्का होता असं अशोक सराफ त्यांच्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

नुकतीच अशोक मामांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, लक्ष्मीकांत सोबत मी जवळपास ६० सिनेमे केले. आणि माझी एक स्टाइल आहे जी लक्ष्मीकांतला माहीत होती. त्याला माहीत होतं मी कधी कुठला लाफ्टर घेणार त्यामुळे तो तयार असायचा. त्यामुळे आमचं टायमिंग चांगला होता. तो लवकर गेला. त्याची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली. काय असतं जाणं हा धक्का असतोच ना. अपेक्षितच असतं एखादा माणूस जाणं. कारण कधी जाईल हे आपल्याला माहीत नसतं. अचानक गेलं की वाटतं गेला.

ते पुढे म्हणाले, ‘पण माहीत असेल तर त्याचा इफेक्ट कमी होतो. आम्हाला थोडीशी कल्पना होती. त्याची एकूण अवस्था बघून त्याची तब्येत ढासळतेय हे पाहून वाटत होतं की हा जाणार आहे. पण तो फारच लवकर गेला. म्हणजे वयाच्या ५२व्या वर्षी तो गेला. तो जर असता तर त्याने अजून काहीतरी चांगलं केलं असतं. माझ्याबरोबरच असं नाही इतर कुणासोबतही, स्वतःचं वेगळं काहीतरी केलं असतं. पण त्याला चान्सचं मिळाला नाही. कारण त्याला जो आजार झाला होता त्यामुळे त्याची ताकद कमी झाली होती.

अशोक मामा म्हणाले, त्यामुळे तो काही करू नाही शकला. पण आता तो असता तर मजा आली असती. कारण आमचं टायमिंग चांगलं होतं. तो असता तर आजची परिस्थिती वेगळी असती. आता अशोक मामा कलर्स मराठीवरील अशोक मा. मा. या मालिकेत दिसत आहेत.